अवकाळीने पिकांची वाताहत शेतकरी हवालदिल

Foto
गंगापूर : तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान केले आहे. शहरासह परिसरात विजेच्या कडकडाटासह अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली.

मार्च महिन्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या दोन-तीन दिवसांत तापमानात मोठी वाढ झाली होती आणि उन्हाचा कडाका जाणवत होता. मात्र अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाने हजेरी लावली. 

संध्याकाळी सुरू असलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे. पावसाने शेतात सोंगणीला आलेल्या गहू, हरभरा, कांदा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. यासोबतच वीट उत्पादकांनाही मोठा फटका बसला असून कच्चा माल भिजल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.